सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. काल आणि आज सातारा शहर व परिसरास ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले.
शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.
जावली तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुर्णतः उघडीप दिली होती. दररोज कडक ऊन पडत होते. त्यामुळे पावसाने पाठ फिरवल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.
कडक ऊनामुळे सोयाबीन, घेवडा, भुईमूग व अन्य खरीप हंगामातील पिके सुकू लागली होती तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. साताऱ्याबरोबर जावली व अन्य तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
देवी कॉलनीत घरांमध्ये पावसाचे पाणी ढगफुटी सदृश पावसाने साताऱ्यात हाहाकार उडवला. ठिकठिकाणी पावसाचे पाणी घरामध्ये घुसले. देवी कॉलनी येथील ओढ्यातील पाणी लगतच्या घरांमध्ये घुसले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा शहरातील वीज पुरवठाही काही काळ खंडीत झाला होता. गोडोली तळे परिसरात पाण्याचे लोट वाहिल्याने नुकसान झाले.