कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या काल करण्यात आल्या. त्यामध्ये शरद पवारांचे खंदे समर्थक आणि कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडे साताऱ्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेने आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या काल करण्यात आल्या. त्यामध्ये शरद पवारांची एकनिष्ठ राहिलेल्या आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर सातारा जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कराड उत्तरचे भाग्यविधाते माजी आमदार पाटील पी. डी. पाटील यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मतदार संघाचे समर्थपणे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र आमदार बाळासाहेब पाटील हे गेली पाच टर्म कराड उत्तराच्या विकासाची धुरा वाहत आहेत. राजकीय स्थित्यंतरात देखील पी डी पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नव्हती. त्याच वाटेवर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब पाटील मार्गक्रमण करत आहेत.
कराड उत्तर मतदारसंघात विरोधकांची अनेक आव्हाने असताना देखील आमदार बाळासाहेब पाटील हे यशवंत विचार आणि आपल्या तत्त्वांशी ठाम राहिले आहेत. म्हणूनच शरद पवार यांच्या गुड बुकमधील आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे साताऱ्यासह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी हा त्यांच्या एकनिष्ठतेचा सन्मान असल्याची कार्यकर्त्यांनी भावना आहे.