सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वळवाचा पाऊस कोसळत असून आज सलग पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सातारा शहरात तर दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे अंधारून आले होते. त्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. दुष्काळी माण तालुक्यातही मंगळवारी दुपारीनंतर चांगला पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सातारा येथील पोवई नाक्यावर महाकाय झाड अवकाळी पावसामुळे कोसळले तर कराडात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
सातारा जिल्ह्यात कडक उन्हामुळे लोक हैराण झाले होते. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यात जीवाची काहीली होत होती. सातारा शहराचे तापमान ४० अंशावर पोहोचलेले. त्यामुळे उन्हाळी पाऊस कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आणि वाळवाचा पाऊस पडू लागला. त्यामुळे पाराही खालावला आहे.
दरम्यान, सातारा शहरासह कराडमध्ये आज, मंगळवारी पाचव्या दिवशी पाऊस पडला. दुपारी तीन वाजल्यानंतर ढग जमण्यास सुरूवात झाली आणि चार वाजण्याच्या सुमारास अंधारून आले. त्यानंतर पावसाचे थेंब पडू लागले. मात्र, पावणे पाचच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. तसेच यावेळी वारेही सुटले. मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. यामुळे वातावरणातील उकाडा आणखी कमी होण्यास मदत झाली.
कराडात वीजांचा कडकडाट
कराड शहराला देखील मंगळवारी सायंकाळी वळीवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. सायंकाळी सहा वाजल्यानंतर जोरजोरात आवाज करत दोन वेळा शहरातील दोन ठिकाणी वीज कोसळली. या वळीवाच्या पावसामुळे आणि वीजांच्या कडकटामुळे शरतील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला. तसेच शहरातील काही भगत झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना देखील घडल्या.
कराड चांदोली मार्गावर झाड कोसळले
कराड चांदोली मार्गावर कालेनजीक पाटीलमळा येथे रस्त्यावर मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसामुळे अचानक झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.