कराड प्रतिनिधी । जून महिना संपत आला तरी मान्सून सक्रिय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अशात सातारा जिल्ह्यातील सातारा, पाटण आणि कराड तालुक्यात मान्सूनने हजेरी लावली. पाटण व कराड तालुक्यात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
शनिवारी सकाळपासून आभाळात ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यात दक्षिण भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कोयना व पाटण परिसरात हलक्या सरी बरसल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे. पेरण्या करण्यासाठी अजून पावसाची खूप आवश्यकता आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांनी मुबलक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे.
पेरण्यांना प्रारंभ करण्यासाठी कराड, पाटण तालुक्यात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. दरम्यान काल कोयनानगरला तर आज पाटण, कराड तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून पावसाळापूर्व कामे केली जात आहेत.
सातारा शहरातही दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील सदर बाजार, पोवई नाका, राजवाडा, महामार्ग परिसरात जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सातारा शहरातीलरस्त्यावर पाणी साचले. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी नागरिकांनी पावसाचा आनंद लुटला. यावेळी पडलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.