पाटणची जनता पुरोगामी विचारांच्या पाठीशी ठाम राहिल – सारंग पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | निवडणूक म्हणजे विचारधारा आणि तत्वाची लढाई असते. या लढाईत पाटणची जनता निष्ठा आणि पुरोगामी विचाराच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.
     
काळोली (ता.पाटण) येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मंजूर झालेल्या सभामंडप कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाटण पं.समितीचे माजी सभापती एल. एम. पवार, पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरपंच कमल गुरव, उपसरपंच प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती.
    
सारंग पाटील म्हणाले, सध्याच्या राजकिय पटलावर चाललेल्या अनपेक्षित व सर्व नितीमुल्य गुंडाळून ठेवलेल्या घडामोडीने समाजमन अस्वस्थ आहे. आपला सातारा जिल्हा व पाटण तालुका हा नेहमीच वाईट गोष्टींचा विरोध करत आला आहे. तो परोगामी विचाराने पुढे चालला आहे. येथील जनतेने कायमच चांगल्या गोष्टीला समर्थन केले आहे. वाईट भूमिकेला तीव्र प्रतिकार करत यशवंत विचाराची पाठराखण करणारा आपला जिल्हा आहे. विचाराचे आणि निष्ठेचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे खा. श्रीनिवास पाटील व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे आहेत. त्यास जनतेने भरभरून साथ दिली. तोच आदर्श नव्या पिढी समोर ठेवणे गरजेचे असल्याने आपला स्वाभिमान आणि निष्ठा ठाम ठेवल्या पाहिजेत.
    
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या विविध विभागात भरीव विकासकामे सुरू आहेत. त्यांच्या पाठपुराव्याने केवळ पाटण महसूल मंडलातील विविध विकासकामांसाठी सुमारे १७ कोटी २६ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय तालुक्यात बीएसएनएलचे ३६ फोरजी मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. याशिवाय प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे, जलजीवन योजनेची कामे, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही कामे होत असताना नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंदच समाधान देतो. तीच खरी श्रीमंती आहे.
     
दरम्यान आडूळ, लुगडेवाडी, येरफळे, केरळ, साखरी, वाडीकोतवडे याठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले. प्रारंभी स्वागत ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील यांनी केले. आभार आनंदा पवार यांनी मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.