पैसे दुप्पट करून देतो असे सांगत नागरिकांची सुमारे 31 लाखांची फसवणूक करणाऱ्या सराफ दांपत्यास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून खंडाळा तालुक्यातील नागरिकांची सुमारे ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सचा मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी नीलम यांना खंडाळा पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाईतील वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या दाम्पत्य विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यापासून खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनील शेळके व त्यांची टीम आरोपीचा वाई व खंडाळा तालुक्यात शोध घेत होती. शेळके यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, वैभव धामणकर हा वाई शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वाईमध्ये सापळा लावून त्यास ताब्यात घेण्यात आले.

त्याला अटक करून खंडाळा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत रामदास किसन रामगुडे (वय 52 वर्षे व्यवसाय -सेवानिवृत्त नायब सुभेदार, मुळ रा. बावडा, ता. खंडाळा, जि. सातारा,) यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यावरून हा गुन्हा दाखल झाला होता.

सन 2005 मध्ये खंडाळा येथील वैभव गोल्ड अँण्ड ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर याच्याशी रामगुडे यांची ओळख झाली होती. त्यांनी या दुकानातून सोने खरेदी केले. यातून ओळख झाली. तेव्हा धामणकर याने आमच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक करा, तुम्हाला एका वर्षात दाम दुप्पट करून देतो अशा स्वरूपाचे अमिष दाखवले.

त्यानंतर रामगुडे यांनी 5 जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2010 पर्यंत बँक खात्यातून पाच लाख 46 हजार पाचशे रुपयांची रक्कम धामणकर यांच्याकडे जमा केली. या रकमेच्या बदल्यात तुम्हाला सोन्याचे बिस्कीट देतो असे धामणकर याने आश्वासन दिले सन 2015 मध्ये पैशाची गरज असल्याने रामगुडे यांनी पैशाची मागणी केली, तेव्हा धामणकर याने आपण वाईमध्ये नवीन दुकान उघडणार आहोत, तेथे स्थिरस्थावर झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करू असे गोड बोलून रामगुडे यांची बोळवण केली. मात्र त्यानंतरही तो पैसे देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची रामगुडे यांचे खात्री झाली. त्यावरून त्यांनी वरील फिर्याद दाखल केली.

रामगुडे यांच्याच फिर्यादीत आणखी एका फसवणूक झालेल्या व्यक्तीची ही फिर्याद नमूद आहे. ती फिर्याद मोहन संपतराव गाढवे (वय- 48 वर्षे व्यवसाय शेती /नोकरी रा. खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी दाखल केली असून त्यांची ही अशा स्वरूपाची फसवणूक झाली आहे वैभव धामणकर याने व त्याची पत्नी निलम धामणकर यांनी एका वर्षात दामदुप्पट करुन देतो, असे आमिष दाखविल्याने सन 2012 पासुन वेळोवेळी त्यांचे नावे ज्ञानदिप पतसंस्था खंडाळा येथून रोख रक्कम 8 लाख 4 हजार 248 रुपये दिलेले आहेत. त्यांनीही पैशांची वारंवार मागणी केली असता वैभव धामणकर व त्याची पत्नी सौ. निलम वैभव धामणकर यांनी मोहन संपतराव गाढवे यांची फसवणुक केली.

तसेच श्रीमती प्रमिला शिवाजी ढमाळ ( वय- 64 वर्षे, रा. खंडाळा, ता.खंडाळा, जि.सातारा ) यांच्याकडून वेळोवेळी 31 तोळे सोने घेऊन त्याची मोड करून त्याच्या यु आर डी परचेस अशा पावत्या तयार केल्या व त्यांचीही फसवणूक केली. त्यांची सासू शेवंताबाई धर्माजी धमाल यांची देखील अशा स्वरूपाची फसवणूक केली आहे. याव्यतिरिक्त मुलगी दिपाली सुशील घारे हिची देखील अशीच फसवणूक केली.

दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सुनील शेळके, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस नाईक महांगरे यांनी तत्परतेने केलेल्या कारवाईचे खंडाळा तालुक्यासह वाई तालुक्यातील नागरिकांनी खंडाळा पोलिसांचे अभिनंदन व कौतुक केले आहे