सातारा प्रतिनिधी | गृह विभागाने सोमवारी सायंकाळी राज्यातील १७ आयपीएस आणि ११ अप्पर पोलीस अधिकारी, अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी तर त्यांच्या जागी सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या दोघांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
बदलीला स्थगिती का?
राज्यातील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात बदलीला स्थगिती देण्यात आल्याचं पत्र जाहीर करण्यात आलं. केंद्रीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन तात्काळ सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर आणि समीर अस्लम शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांना पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे
अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण हटवलं
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण समीर शेख यांच्या कार्यकाळात हटविण्यात आलं होत. अत्यंत गोपनीय पध्दतीने पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. तसेच यंदाच्या अतिवृष्टीच्या काळात समीर शेख यांनी जीवीतहानी रोखण्यासाठी पर्यटनस्थळं बंद करण्याचे आदेश दोनवेळा काढले होते. तिसऱ्यांदा देखील बदलीचा आदेश काढण्यात आला मात्र, तो रद्द करण्यात आला आहे.
पुसेसावळी दंगलीचा डाग
समीर शेख यांच्या कार्यकाळात खटाव तालुक्यातील पुसेसावळीत दंगल झाली. प्रार्थनास्थळावरील हल्ल्यात अल्पसंख्याक समाजातील तरूणाचा बळी गेला. जाळपोळ, मोडतोड झाली. आठ दिवस संचारबंदी होती. तसेच काही दिवस इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली होती. मायणी मेडिकल कॉलेजचं कोविड काळातील प्रकरण, वाई तालुक्यातील पाचवड कॉलेजमधील प्राध्यापिकेविरोधातील कारवाईत उच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. या घटनांनी समीर शेख यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी परिस्थिती उत्तम रीतीने हाताळली.
राज्यातील बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे, कंसात नियुक्तीचे ठिकाण :
अतुल कुलकर्णी (पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), श्रीकृष्ण कोकाटे (पोलिस अधीक्षक, हिंगोली) हिंगोली), सुधाकर बी. पठारे (पोलिस अधीक्षक, सातारा), अनुराग जैन (पोलिस अधीक्षक, वर्धा), विश्व पानसरे (पोलिस अधीक्षक, बुलढाणा), शिरीष सरदेशपांडे (पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे), संजय वाय. जाधव (पोलिस अधीक्षक, धाराशीव), कुमार चिता (पोलिस अधीक्षक, यवतमाळ), आँचल दलाल (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र.१, पुणे), नंदकुमार ठाकूर (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, दौंड), नीलेश तांबे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर), पवन बनसोड (पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती), नुरुल हसन (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११, नवी मुंबई), समीर अस्लम शेख (पोलिस उप आयुक्त, मुंबई शहर), अमोल तांबे (पोलिस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे), मनिष कलवानिया (पोलिस उप आयुक्त, मुंबई शहर), अपर्णा गिते (कार्यकारी संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई).