पाटण प्रतिनिधी । सध्या पावसाळा चांगली सुरुवात झाली असल्याने पाटण तालुक्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, या याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय एका पतिपत्नीला आला आहे. येथील सडावाघापूरचा उलटा धबधबा पहायला गेलेल्या एका पतीला तिच्या पत्नीसमोरच 6 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्या 6 तरुणांनी पत्नीकडे पाहून आरडाओरडा केल्यामुळे त्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील सडावाघापूर पठारावर सातारा तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी दुचाकीने धबधबा पहायला गेले होते. त्या ठिकाणी गेल्यावर पवनचक्कीजवळ उभे राहून दोघांनी मोबाईलमधून काही सेल्फी फोटोही काढले. त्यांच्याप्रमाणे धबधब्याच्या ठिकाणी इतर 5 ते 6 तरुणही फिरण्यासाठी आले होते. त्यांनी पत्नीकडे पाहून आरडा-ओरडा केला. त्यांच्या आरडाओरडा करण्यामुळे पतीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारला असता त्या तरुणांनी पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
आपल्या पतीला मारताना पाहिल्यानंतर पत्नीने त्या तरुणांना पतीला सोडा अशी विनवणी केली. आणि पतीला तरुणांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ती पुढे गेली असता त्या तरुणांनी तिला धक्काबुक्की करत बाजूला ढकलले. तरुण पतीला मारल्यानंतर त्या ठिकाणाहून पसार झाले. मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीने पतीला घेऊन थेट मल्हारपेठ पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीने फिर्याद दाखल केल्यानंतर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार आनंद आव्हाड करत आहेत.