सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल प्रसिद्ध केला असून, मंगळवारपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडेल. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा व या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, फलटण पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, आदी उपस्थित होते.
यावेळी ढोले म्हणाले की, निवडणुकीचा कार्यकाल स्पष्ट करताना दि. २२ ऑक्टोबरपासून निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरता येईल. दि. २९ ऑक्टोबर रोजी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करता येईल. दि. ३० रोजी नामनिर्देशन पात्रांची छाननी केली जाईल. दि. ४. नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील आणि दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येईल.
या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून मतदान करता येणार आहे. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, फॉर्म १२ डी भरून घेतला जाईल. यामध्ये दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांचे गृहभेटीद्वारे मतदान घेण्यात येईल. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे ढोले यांनी म्हंटले.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघ २५५
१) एकूण मतदार : ३३८४६४
२) पुरुष मतदार : १७२४५९
३) स्त्री मतदार : १६५९९१
४) इतर मतदार : १४
५) सैनिक मतदार : ९५६
६) दिव्यांग मतदार : २१६०
एकूण मतदान केंद्रे : ३५५
ग्रामीण मतदान केंद्रे : ३०८
शहरी मतदान केंद्रे : ४७