सातारा प्रतिनिधी । मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ज्या ठिकाणी आपत्ती उद्भभवेल त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहचतील. त्याठिकाणी तत्काळ प्रशासनाकडून मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अतीवृष्टी व दरड प्रवण क्षेत्रात करावयाच्या उपायोजनांचा पालकमंत्री देसाई यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गावांमध्ये पूर किंवा दरडी कोसळल्या तर तेथील नागरिकांची विविध शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या शाळांमध्ये औषधे, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, लाईट या सह सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी 1 जुलै पासून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन व एनडीआरएफ मार्फत पूर प्रवण व दरड प्रवण तालुक्यामध्ये शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम तसेच साहित्याची चाचणी घेण्यात आलेली आहेत.
दरड कोसळून रस्ते वाहतूक विस्कळीत होणारी नाही यासाठी मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळून-कराड मार्ग, सज्जनगड-ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग व शेंद्रे ते बामणोली मार्गावर जेसीबी, पोकलेन, क्रेन व डंपर इत्यादी वाहने ठेवण्यात आलेली आहेत. डोंगरी तसेच पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी मान्सून कालावधीत सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.