कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीच्या निकालावरून रोहिणी खडसे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. “4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या ‘सहयाद्री कारखाना’ निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील…..”,असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यंदा निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, काँग्रेस कराड उत्तरचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात आणि बाळासाहेब पाटील या नेत्यांमधे तिरंगी लढत पार पडली होती.
कारखान्यातील निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने 4000 मतांची आघाडी घेतली होती. अनेक तास मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाचा विजय निश्चित झाला असून सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल 15 हजाराहून अधिक मते मिळाली.
तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला 7000 ते 8000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला 2200 ते 2300 मते मिळाली.