पाटण प्रतिनिधी । गुहागर-विजयपूर महामार्गावरील संगमनगर ते पाटण रस्त्याच्या दुरवस्था विरोधात मंगळवारी संगमनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महामार्ग विभागाला रस्ता वाहतुकीस योग्य करण्यासाठी दि. ४ सप्टेंबर म्हणजे गणपती आगमनापूर्वीची मुदत दिली आहे. या मुदतीत रस्त्याचे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत झाली नाही तर रस्त्याला जेसीबी लावण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राजाभाऊ शेलार, बाळासाहेब कदम, पंकज गुरव, सत्यजित शेलार, संपत जाधव, पी.पी. साळुंखे आदींनी उपस्थित राहून रस्त्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. आंदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहायक अभियंता पूजा परदेशी, कनिष्ठ अभियंता मणेर, सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे, मंडलाधिकारी संजय जंगम, तलाठी शशिकांत बोबडे व नीलेश भाग्यवंत आदी उपस्थित होते.
बबनराव कांबळे म्हणाले, आंदोलनाची घोषणा केली की खड्डे भरण्याची लगभग सुरू होते. महामार्ग विभाग व ठेकेदारांनी यापूर्वीच रस्त्याची जबाबदारी घेतली असती तर आमच्यावर आंदोलनाची वेळ आली नसती. यापुढे महामार्ग खड्डे मुक्त झाला नाही तरी पुन्हा मोठे आंदोलन उभारले जाईल. राजाभाऊ शेलार म्हणाले, यापूर्वी अनेक आंदोलन बैठका झाल्या. मात्र रस्त्याची स्थिती बदलत नाही. याचा अर्थ कोयना भागातील लोकांवर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे. आज प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आंदोलन मागे घेतले असले तरी यापुढे आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी माघार घेणार नाही.
अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलन स्थळी महामार्ग विभागाचे सहायक अभियंता पूजा परदेशी यांनी भेट दिली. संगमनगर ते पाटण या १३ किमी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सातत्याने सुरू असून पावसामुळे डांबराने खड्डे भरता आले नाहीत. तसेच नवीन रस्त्याच्या कामासाठी पंधरा दिवसात ठेकेदार आवश्यक मशिनरी आणणार असून महिनाभरात शासकीय प्रकिया पूर्ण झाली की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.