कराड प्रतिनिधी । कराड येथील उपविभागीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते नुकताच रिक्षांना क्यूआर कोड बसवण्यास प्रारंभ करण्यात आला.
कराड येथील उपविभागीय कार्यालयात प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, रिक्षा संघटनचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
महिला, मुलींसह एकूणच सर्व प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा पोलिस दलाने प्रत्येक रिक्षावर क्यूआर कोड बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरासह तालुक्यातील रिक्षांचा सर्व्हे करण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिल्या होत्या. वाहतूक नियंत्रण शाखेच्या संदीप सूर्यवंशी यांच्यासह वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन महिने सातत्याने रिक्षांची तपासणी करत रिक्षा चालकांकडून त्यांची सर्व माहिती असणारे अर्ज भरून घेतले.
यामध्ये रिक्षाचालकाचे नाव, रिक्षाचा नंबर, चेसीस नंबर, चालकाचा फोटो, रिक्षा कोणत्या थांब्यावर असते. चालक व मालकाचा मोबाइल नंबर, ई- मेल आयडी यांसह सर्व माहिती घेण्यात आली. ही माहिती संकलन करून ती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आली. त्याचा डेटा एकत्र करून तो ऑनलाइन भरण्यात आला. याद्वारे आता कोणत्याही रिक्षावर लावलेल्या क्यूआर कोडवरून त्या रिक्षाची माहिती अगदी सहज प्रवाशाला समजणार आहे. याप्रसंगी रिक्षाचालक, मालकांसह रिक्षा पदाधिकारी उपस्थित होते.