कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) परिसरात सतत पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीला सुरुवात झाली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे मका आणि भुईमूग यांची पेरणी राहिली आहे. तरवे आल्यामुळे आता शिवार माणसानी गजबजला आहे.
पावसाने समाधानकारक सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परिसरातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या लागणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाताचे तवरे ही जोमात आले. या खरिपाच्या हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका व इतर कडधान्य ही पिके घेतली जातात. मात्र डोंगर पट्टयात भात पिकाचे प्रमाण मोठे आहे.
भात लागणीची सध्या धांदल उडाली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी शेतात भात लागणीच्या कामात गुंतलेला दिसून येत आहे. बैलांच्या साह्याने तर काही ठिकाणी लहान पॉवर टिलरच्या साह्याने चिखल करून भात लागण केली जात आहे. भात लागणीमध्ये महिला, पुरुषाबरोबरच लहान मुलेही शेतात भात रोपांची लागण करताना दिसून येत आहेत. मजुरांची कमतरता असल्याने पै पाहुण्यांना बोलावले जात आहे. तर काही भागामध्ये पैरा पद्धतीचा वापर केला जात आहे. एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करत आहेत.