कराड प्रतिनिधी । गमेवाडी, ता. कराड येथील उत्तम जाधव यांच्या बोडका म्हसोबा शिवारात असलेल्या विहिरीत एक बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना काल शनिवारी घडली होती. यावेळी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत बछड्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले होते. दरम्यान, रात्री या बछड्याचे व आईचे पुनर्मिलन घडवून आणले. त्यांच्या या भेटीची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडल्याचे सकाळी उत्तम जाधव यांचे बंधू दादासाहेब जाधव यांनी पाहिले. त्यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील शंकर जाधव यांना दिली. पोलीस पाटील जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कराड वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांना माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सदर पिल्लू सुखरूप विहिरीतून बाहेर पिंजऱ्यात काढले.
बिबट्याचे नर जातीचे दोन महिन्यांच्या पिल्लूची मादी बरोबर पुनर्मिलन घडवण्यासाठी वनविभागने रात्री ९.३० वाजता शेतात ऐका ठिकाणी पिंजऱ्यात बछड्यास ठेवले. तसेच त्या ठिकाणी कॅमेरे लावले. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पिंजरा शेजारी मादी बिबट्या घुटमुळू लागली. त्याक्षणी पिंजऱ्याचे दार उघडुन बछड्यास मादी जवळ सोडण्यात आले.
यावेळी राबविलेल्या रेस्क्यू मोहिमेत नरेश चांडक, सिधी पांचारीया, कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक कविता रासवे, वनरक्षक राठोड,वनमजूर मयूर, शिबे,योगेश बेडेकर, प्राणीमित्र अजय महाडीक, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, मयुर लोहाना, मयुरेश शानबाग, पोलीस पाटील शंकर जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.