कराड प्रतिनिधी | परतीच्या पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सध्या खरीप हंगामातील सुगीची कामे सुरू असून, परतीच्या पावसामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी देखील पावसाने कराड तालुक्यात हजेरी लावली.
मागील काही दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले होते. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप दिली होती. त्यामुळे सोयाबीन, घेवडा, चवळी, मूग, चणा, भुईमूग आदी खरीप पिकांच्या सुगीच्या कामांना वेग आला आहे.
शेतशिवारे बळीराजाच्या राबत्यामुळे वर्दळली आहेत; मात्र बुधवारी सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती; परंतु त्यानंतर कडक ऊन पडले. वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी ४ नंतर वातावरणाचा नूरच पालटला. अचानक पावसाची भुरभुर सुरू होऊन दहा ते पंधरा मिनिटे बारीक पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सुमारे अर्धातास पुन्हा पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे फिरते व्यावसायिक, भाजी व फळविक्रेते तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात सुगीच्या कामांमध्येही पावसामुळे खोळंबा झाला.