पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिल्यामुळे अनेक गावात पाणी टंचाई भासत आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नसले तरी सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजता सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणात सध्या ८९ टीएमसीवरच साठा शिल्लक आहे. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमएसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच पिण्यासाठीही पाण्याची तरतूद आहे. तर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठीही पाणी विसर्ग करण्यात येतो. धरणाच्या आतापर्यंतच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात कोयना धरण ९ वेळा भरलेले नाही.
यावर्षी तर पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा ९३ टीएमसीपर्यंतच पोहोचला. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन त्यातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. तर एक महिन्यापूर्वीही सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी झाल्याने धरणातून पाणी विसर्ग करण्यात आलेला. गेल्या २ महिन्यात ३ वेळा सांगलीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे.
‘या’ गावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा दिला होता इशारा…
पाण्यासाठी मौजे डिग्रज येथे आज ग्रामस्थांनी काेयनेच्या पाण्यासाठी नदी पात्रात उतरुन आंदाेलन केले. यावेळी ग्रामस्थांनी काेयना धरणातून पाणी न साेडल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला हाेता. त्यांच्या आंदोलनानंतर आता कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
सांगलीच्या आमदारांची शिष्टाई तर सातारच्या पालकमंत्र्यांचा हाेकार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार अनिल बाबर यांनी कृष्णा नदीतील कोरड्या पडलेल्या परिस्थितीची दूरध्वनीवरुन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईंना माहिती दिली. दाेन्ही लाेकप्रतिनिधींच्या चर्चेनंतर मंत्री देसाईंनी काेयनेतून पाणी देण्यात येईल असे आमदार बाबर यांना आश्वासन दिले होते. त्यानंतर आज कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.