पाटण प्रतिनिधी । गुहागर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने पाटण ते संगमनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या व्यक्तींचा बळी गेला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या वाहनधारकांसह प्रवाशांचे शारीरिक, आर्थिक नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या नागरिकांमधून केल्या जात आहेत. याबाबत उद्या मंगळवार, दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता संगमनगर धक्का येथे आंदोलन करण्याचा इशारा माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, माजी सरपंच बाळासाहेब कदम यांच्यावतीने निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी पाटण यांच्यासह संबंधित प्रशासनाला दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गत सात ते आठ वर्षांपासून या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, पाटण ते संगमनगर हा रस्ता खिळखिळा झाला असून, भले मोठे खड्डे पडल्याने याबाबत न्याय मिळविण्यासाठी स्थानिकांना दरवर्षी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो. संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांकडून सामान्य जनता व वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काहींचे बळी गेले आहेत. याशिवाय अनेकांचे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. वाहनांसह स्थानिक छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी यांनाही याचा फार मोठा फटका बसला आहे.
अनेक तरुण कमी वयात विविध व्याधींनी त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे होणारे नुकसान न भरुन निघणारे आहे. काहींचा या दुरवस्थेत बळी गेला असून, त्या बळीप्रकरणी आता संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासह यात हजारोंच्या संख्येने कायमचे जायबंदी होत त्यांची शारीरिक व आर्थिक मोठी हानी झाली असल्याने याची नुकसानभरपाई संबंधितांकडून देण्यात यावी. यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे व संबंधितांवर तातडीने मनुष्यवधाचा व नुकसानभरपाई संदर्भात गुन्हे दाखल करण्याचीही निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, माजी सरपंच बाळासाहेब कदम, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, पंकज गुरव यांच्या सह्या आहेत.