पाटण प्रतिनिधी | कोयना अभयारण्यात अनेक दुर्मीळ असे प्राणी, पक्षी आढळत असतात. हा मोठा कुतूहलाचा विषय आहे. असाच एक दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी सद्या कोयना अभयारण्य परिसरात आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला असून आजवर या संस्थेने अनेक दुर्मीळ वन्यजीव, घुबड, फुलपाखरांचा शोध लावला आहे.
कोयना विभागात पर्यटनासोबत वन्यजीवांचे फोटोग्राफी, संशोधन, जैवविविधतेचा अभ्यास करणारी ‘डिस्कवर कोयना’ या संस्थेच्या सदस्यांना फोटोग्राफी करताना एक दुर्मीळ प्राणी कॅमेरात कैद झाला. संस्थेच्या सदस्यांनी कॅमेरामधील प्राण्याचे बारकाईने निरीक्षण केले असता. निसर्ग अभ्यास व अनुभवावरून हा पश्चिम घाटातच आढणारा ‘तपकिरी पाम सिवेट’ असल्याचे सिद्ध झाले.
आजवर गोव्यातील कॅसलरॉक ते कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील उंच पर्जन्यवनात हा प्राणी आढळतो, अशा लँडस्केपमध्ये टिकून राहण्याची त्याची क्षमता ही फळझाडांच्या प्रजातींच्या विविधतेवर अवलंबून असते. तपकिरी पाम सिवेट एकाकी व निशाचर असणारा प्राणी आहे. तो दिवसा झाडांच्या डोली, पोकळ्या, वेलीचे जाळे, शेकरूचे घरटे आणि फांद्यांच्या काट्यामध्ये आराम करत असतो. काही वेळा रात्री उघड्या फांद्यांत विश्रांती घेत असतो. प्रामुख्याने हा झाडाची फळे खाऊन जगणारा प्राणी आहे.
काही ठिकाणी याचा अधिवास नष्ट झाल्यामुळे अथवा शिकारीमुळे जैवविविधतेवर परिणाम होतो. ‘तपकिरी पाम सिवेट’ हा विखुरणारा प्राणी असल्याने जैवविविधता संवर्धनासाठी निसर्गातील एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो.