फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन्ही राजे बंधूंवर साधला निशाणा; म्हणाले, त्यांचे मानसिक स्वास्थ्य…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील संपर्क कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रणजितसिंह बोलत होते. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील, रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी श्रीमंत रामराजे यांच्यासह त्यांच्या दोन्ही बंधूंनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. त्यामध्ये त्यांना यश आले असले तरीसुद्धा फलटण तालुक्याने आता राजे गटाला नाकारले आहे. याचे कारण म्हणजे लोकसभेला फलटण तालुक्यासह विधानसभा मतदारसंघांमधून जे मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात सर्वसामान्य नागरिकांनी दिले आहे; त्यामुळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

गतकाही दिवसात पूर्वी फलटण तालुका सहकारी दूध संघाची जमीन विक्री करण्यासाठी काढण्यात आली होती. त्या विरोधात फलटण प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याला उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले होते की; मोर्चा काढलेल्यांमध्ये एकही सभासद नाही. त्यावर रणजितसिंह म्हणाले की; स्वतःची खाजगी दूध संस्था वाढवण्यासाठी फलटण तालुका सहकारी दूध संघा मध्ये सभासद सुद्धा ठेवले नाहीत व वाढवले नाहीत. जर सभासदच ठेवले नाहीत तर ते दूध कसे घालणार ? असा प्रतिसवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला.