सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देऊन राज्य सरकारने कारखान्यावर प्रशासकाही नेमणूक केली. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. “श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्यांनी शोषून त्यात दमडीही ठेवली नाही. तुमचे पराक्रम फलटणमधील सर्वसामान्यांना माहिती आहेत. तुम्ही श्रीराम कारखाना भाड्यानं दिला तो दिला. पण, फलटणच्या हक्काचं पाणीसुद्धा तुम्ही 30 वर्षे भाड्यानं दिलं होतं. ते आम्ही ताकदीने परत मिळविले, असा हल्लाबोल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता रामराजेंवर केला.
फलटण येथे माजी खासदार निंबाळकर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना मागील पंधरा वर्षे भाडेतत्वावर चालविण्यासाठी आवाडेंना देण्यात आला होता. भाडे वाढविण्याऐवजी भाडे कमी होणारा कारखाना, जमिनी घेण्याऐवजी जमिनी विकणारा कारखाना, कर्जमुक्त कारखाना म्हणून सांगतात, पण कारखान्यावर 115 कोटी रुपये कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.
आवाडेंच्या जीवावर त्यांना कारखाना चालवायचा असेल तर त्याबाबत मला काही बोलायचे नाही. पण दुर्दैव आमचे आहे की, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच तिजोरी लुटली, अशी फलटण तालुक्याची परिस्थिती आहे. इथले लोकप्रतिनिधी श्रीमंत म्हणून त्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्या कारखान्याला शोषून आज दमडीही ठेवली नाही. पुढे हा कारखाना अवसायनात काढावा लागेल, अशी परिस्थिती त्यांनी आणून ठेवली आहे. चार हजार सभासंदाचे हक्क डावलण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून त्यांना त्यांचे हक्क द्यावे लागतात, असेही रणजितसिंह नाईक निंबाळक यांनी स्पष्ट केले.