ईव्हीएम हॅक करुन दाखवा, माझी प्रॉपर्टी गिफ्ट देतो; ‘या’ माजी खासदारांनं केलं आवाहन

0
1

सातारा प्रतिनिधी | जो कोणी महाराष्ट्रातील ई. व्ही. एम. मशीन हॅक करुन दाखवेल त्याला मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून द्यायला तयार आहे. माझं चॅलेंज कोणीही स्वीकारावं, असे आवाहन माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी विरोधकांना केले.

ई. व्ही. एम मशीन हॅक केल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये उलटफेर झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. यावर बोलताना रणजितसिंह म्हणाले, ईव्हीएमबाबत आरोप करणारे आ. उत्तमराव जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांना परवाच फोन करून मी सल्ला दिला होता की उत्तमराव महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात संभ्रम निर्माण करायचं सोडून द्या. जर तुमच्याकडे ईव्हीएम मशीन हॅक करण्याची यंत्रणा असेल तर निवडणूक आयोगाचे चॅलेंज स्वीकारा. ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. रणजितसिंह ना. निंबाळकर हे त्यांची जेवढी प्रॉपर्टी असेल ती सर्व आमदार उत्तमरावांच्या नावावर करायला तयार आहे.

निंबाळकर पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांद्वारे मी जाहीर सांगतो जो कोणी महाराष्ट्राचं ईव्हीएम हॅक करेल त्याला मी माझी संपूर्ण प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून द्यायला तयार आहे. असं कोणी चॅलेंज स्वीकारत असेल तर त्याने ते स्वीकारावं. मतदान जे झालेलं आहे ते व्हीव्हीपॅटवर दिसले आहे. ज्यानं कोणी मतदान केलं आहे हे बॅलेट पेपरवर झाल्यासारखं असून मतदान करणार्‍याला आपण कोणाला मतदान केलं हे दिसलं आहे.

केवळ पराभवामुळे गैरसमज निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत सुरु आहे. संविधान बदलासह अनेक खोट्या अफवाच्या जीवावर जगायचं हे बंद करावं. ईव्हीएमबाबत निराधार बोलण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जनमानसामध्ये येऊन कामाला सुरुवात करावी, असे आवाहनही रणजितसिंह यांनी केले. तसेच मी दिलेल्या शब्दापासून मागे फिरणार नाही. माझी स्वतःच्या मालकीची संपूर्ण प्रॉपर्टी निश्चितपणे जो कोणी ईव्हीएम हॅक करून दाखवेल त्यांना गिफ्ट म्हणून देईन. नाहीतर या लोकांनी महाराष्ट्राची फसवणूक केली, दिशाभूल केली म्हणून महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहनही रणजितसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षास केले.