निंबुतमधील गोळीबारातील गंभीर जखमी रणजीत निंबाळकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | बारामती तालुक्यातील निंबुत येथे शर्यतीच्या बैलावरून झालेल्या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गत 2 दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील तावडी येथील रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गोळी लागली असून पुण्यातील दवाखान्यात उपचार सुरु होते. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, त्यांचा मुलगा गौरव यांना अटक केली आहे. काकडे यांचा दुसरा मुलगा गौतमसह चौघे फरार असून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, निंबाळकर यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. राज्यामधील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांची ओळख होती. यासोबत ते ज्ञानज्योत करिअर अकादमीचे ते संस्थापक होते.

नेमका काय घडला प्रकार?

रणजित यांनी गौतम काकडे यांच्याकडून गतवर्षी सर्जा नावाचा बैल विकत घेतला होता. आता रणजित यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम यांनी 37 लाख रुपयांना घेतला. त्यापैकी 5 लाख रुपये गौतमने रणजितला दिले होते. गुरुवारी उर्वरित रक्कम नेण्यासाठी त्यांना निंबुत येथे बोलावले होते. बैल खरेदी केला त्याच दिवशी काकडे यांनी तो खटाव तालुक्यातील बुध येथून निंबुतला नेला. गुरुवारी सकाळी 11 वाजता रणजित निंबाळकर व संतोष तोडकर हे गौतम काकडेंकडे आले होते. त्यावेळी राहिलेले पैसे न देता तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा, असे काकडे म्हणत होते. तर पैसे मिळाल्याशिवाय सही करणार नाही, असे सांगून आल्याचे रणजित यांनी पत्नी अंकिता यांना सांगितले होते. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रणजित, पत्नी अंकिता, त्यांची दहा महिन्यांची मुलगी अंकुरण, नातलग वैभव भारत कदम, पिंटू प्रकाश जाधव हे लोणंद येथे आले. तेथे तोडकर यांनी निंबाळकर यांना, काकडे हे तुम्हाला सगळे पैसे दिल्याचे सांगत आहेत, मग तुम्ही सही का करत नाही अशी विचारणा केली. त्यावर सर्व रक्कम मिळाली नसल्याचे सांगत निंबाळकर निंबुतला आले. तेथे गौतम यांनी, सकाळी पैसे देतो. आता स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले. तर रणजित यांनी, उरलेले पैसे द्या, सही करतो. अन्यथा पाच लाख रुपये परत करतो, माझा बैल मला द्या,’ असे सांगितले. त्यावेळी गौतम यांनी ‘तू बैल कसा घेऊन जातो तेच मी बघतो’, असे म्हणत काही युवका व भाऊ गौरवला बोलाविले. ते आल्यानंतर वाद होऊन गौरवने पिस्तुलामधून रणजित यांच्या डोक्यात गोळी झाडली. जखमी रणजित यांना तत्काळ वाघळवाडीतून बारामतीतील खासगी रुग्णालय व तेथून पुण्याला उपचारासाठी हलविले.