सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फलटण तालुक्यातील राजे गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात आज दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस आ. रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गत काही महिन्यांपूर्वी आ. रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर फलटणमध्ये अनेक घडामोडी घडल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने माढा लोकसभा मतदारसंघासाठी फलटणमध्ये नक्की काय भूमिका घ्यायची, याबाबत तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊनच आ. रामराजे नाईक निंबाळकर हे पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे समजत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून आ. रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर हे माढा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची भेट घेत लोकसभेच्या माढा मतदारसंघाबाबत रणनीती आखत आहेत. विविध नेत्यांच्या भेटीदरम्यान माढ्यामध्ये आपल्याच विचाराचा व सर्वमान्य उमेदवार असावा, असा विचार पुढे येत आहे.
दि. १ फेब्रुवारीच्या बैठकीत आगामी माढा लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते काय भूमिका मांडणार? त्यानंतर आ. रामराजे नाईक निंबाळकर हे नक्की काय भूमिका जाहीर करणार, याकडे तालुक्यासह माढा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.