सातारा प्रतिनिधी । कोयनेच्या राजकारणातील दिपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते राम मारुती पवार यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोयना भाग १०५ गावांसह सातारा, सोलापूर, रायगड, ठाणे, खोपोली, नारायणपूर येथील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पावशेवाडी या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कोयनेच्या राजकारणातील ध्रुवतारा निखळला, अशा शब्दात समाजबांधवांसह राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
पवार यांची प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. कोयनेसह सातारा-जावळीच्या राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. समाजकारण, राजकारण, पुनर्वसन आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
माजी आमदार स्व. जी.जी. कदम, मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. स्पष्टवक्तेपणा आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कोयनेच्या सामाजिक-राजकीय चळवळीची मोठी हानी झाली आहे. अगदी प्रतिकूल काळातही त्यांनी तत्वे आणि मूल्ये कायम जोपासली. त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.