सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तर जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला ४, तर नवजा येथे ५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयनेत पाण्याची आवक फक्त २ हजार ७५८ क्युसेक वेगाने होऊ लागली आहे. धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही यंदा लवकरच नवजाचा पाऊस ७०० मिलिमीटरजवळ पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन वेळेत झाल्यामुळे मागील १९ दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली. पूर्व, तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही पावसाने अजूनही म्हणावा असा जोर धरलेला नाही. मागील १० दिवसांपासून पश्चिम भागात तर पावसाची उघडझाप सुरू आहे. एखादा दिवस पावसाने जोर धरला तर नंतर उघडझाप होत आहे. परिणामी धरणात अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू नाही. त्यातच सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला प्रत्येकी ४ मिलिमीटर पाऊस झाला, तर एक जूनपासून कोयनानगर येथे ५२६ आणि महाबळेश्वरला ४४० मिलिमीटरची नोंद झाली, तर नवजा येथे आतापर्यंत ६७३ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झाली आहे. त्यामुळे सावकाशपणे धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला होता. टक्केवारीत हे प्रमाण १५.६६ आहे. तरीही गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
पश्चिम भागात पावसाची उघडझाप असली तरी पूर्वेकडे प्रमाण कमी झाले आहे. तरीही आतापर्यंत माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला आहे, तसेच खते आणि बियाणे दुकानातही गर्दी होत आहे. पूर्व भागात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.