कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; आजपर्यंत किती झालाय पाणीसाठा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे यावर्षी चिंतेचे वातावरण राहिलेले नाही. कारण, वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले आहे.

हवामान विभागाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस जोर धरेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला होता. मात्र, त्या अनाजाप्रमाणे पाऊस पडत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विभागाचा अंदाज आतापर्यंत तरी फोल ठरलेला असून जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागातही मोठा पाऊस झाला नाही. पश्चिम भागात चार दिवसानंतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २१ मिलिमीटर पाऊस पडला तर महाबळेश्वरला ५ मिलिमीटरची नोंद झाली. नवजाला पाऊस झालाच नाही तर १ जूनपासून आतापर्यंतचा विचार करता कोयनानगरला ५ हजार ६१० तर महाबळेश्वर येथे ६ हजार ५२१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. जिल्ह्यात पाथरपुंजनंतर नवजा येथे सर्वाधिक ६ हजार ८१७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

२ हजार १०० क्युसेक विसर्गही थांबला

कोयना धरणात बुधवारी सकाळी १ हजार २५३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४.७१ टीएमसी होता. ९९.४९ ही पाणीसाठ्याची टक्केवारी आहे तर दोन दिवसांपूर्वीच धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट बंद करण्यात आली. त्यामुळे २ हजार १०० क्युसेक विसर्गही थांबलेला आहे.