कराड प्रतिनिधी । शेतकरी बंधुनो घरात बसून ऊसाला दर मिळणार नाही. गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी आंदोलन झाले नसल्यामुळे उसाला दहा वर्षांत वाढीव दर मिळालेला नाही. त्यासाठी घरातून बाहेर पडा आणि घामाचा दाम घेण्यासाठी रस्त्यावर या सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. आता सर्वांना बाहेर पडून लढावे लागेल तरच न्याय मिळेल. शेतकऱ्याच्या ऊसाला सोयाबीनला कापसाला कांद्याला दुधाला मातीमोल भाव मिळत आहे तरीसुद्धा शेतकरी सरकारच्या भिकेची वाट बघत घरात बसलेला आह. लढला तर येणाऱ्या काळात प्रत्येक शेतमालाला मागील तेवढा भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यानो रस्त्यावर उतरा, असे आवाहान बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ऊसदराबाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात उपाध्यक्ष सुनील कोळी, उपाध्यक्ष उत्तम खबाले, बाबासो मोहिते, सागर कांबळे, शंभू पाटील आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पंजाबराव पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने साखरेवरील निर्यात बंदी उठवावी इथेनॉलसाठी उसाच्या रसावरील बंदी उठवावी, ऊसाच्या एफ आर पी बेस पूर्वीप्रमाणे साडेआठ टक्के रिकवरी ठरवावा तरच उसाला योग्य भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांना सहकार विरोधात लढावे लागेल. आज पर्यंत लहान शेतकरी ऊसाच्या दरासाठी लढत आलेला आहे. सध्या कष्टाला किंमत राहिलेली नाही लोकांना मोदींचे सहा हजार लाडक्या बहिणीचे दीड हजार एस टी मोफत रेशन मोफत यातच जनता गडबडून गेलेली आहे. शेतकरी हक्काचे कष्टाचे घामाचे दाम मागायचे विसरलेला आहे. शेतकऱ्याच्या ऊसाला सोयाबीनला कापसाला कांद्याला दुधाला मातीमोल भाव मिळत आहे तरीसुद्धा शेतकरी सरकारच्या भिकेची वाट बघत घरात बसलेला आहे.
भाजप आमदार डॉ. अतुलबाबा भोसलेंना दिले निवेदन
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या आपल्या जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झालेले आहेत परंतु कोणत्या कारखान्याने उसाचा दर जाहीर केलेला नाही तरी आपण ऊस दराची कोंडी फोडावी आणि जाणाऱ्या उसाला एक रकमे चार हजार रुपये दर जाहीर करावा तसेच आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला साखर निर्यात बंदी उठवावी साखरेचे भाव प्रति किलो चाळीस रुपये करण्यात यावा इथेनॉल साठी उसाचा रस वापरण्यास परवानगी मिळावी उसाचा एफ आर पी बेस साडेआठ टक्के पूर्वीप्रमाणे करण्यात यावा यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करावी, अशी मागणी पंजाबराव पाटील यांनी केली.