पाटणमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली द्वारे जनजागृती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदार संघामध्ये प्रशासनाच्या वतीने रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार यादीचे शुध्दीकरण करताना सुमारे 13 हजार 800 मयत ,दुबार ,स्थलांतरित ,विवाह होऊन परगावी गेलेल्या मतदारांची नावे कमी केली असून सुमारे 12 हजार 300 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

या मोहिमेदरम्यान काही BLO यांनी सांगली जिल्ह्यात जाऊन प्रकल्पग्रस्तांची नावे कमी केली आहेत. तर काही BLO यांनी तारळे परिसरात कातकरी समाजातील नागरिकांची नावे स्वतः पुढाकार घेऊन मतदार यादीत समाविष्ट करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मतदार नोंदणी अधिकारी सुनील गाढे यांचे मार्गदर्शनाखाली केला आहे. या मोहिमेमध्ये अशा प्रकारे नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या 14 महसूल मंडळात सुमारे 28 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जागृती संदर्भात पथनाट्य सादर केले. तसेच या निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,निर्बंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा, मध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार रमेश पाटील , प्रभारी नायब तहसीलदार अजमुद्दिन मुलाणी, मंडळ अधिकारी विलास गभाळे, अव्वल कारकून गजेंद्र कांबळे, तुकाराम वाघमोडे , बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती अत्तार आदींनी परिश्रम घेतले .

अंतिम मतदार यादी ही 23 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली असून प्रजासत्ताक दिनी या यादीचे ग्रामसभेत वाचन करावे , व अनवधानाने किंवा चुकून एखादे नाव कमी झाले असेल तर त्यासाठी पुन्हा 6 नंबरचा फॉर्म भरावा. तसेच 18ते 19 वयोगटातील जे मतदार अजूनही नोंदणी पासून वंचित असतील तर अशा सर्व नवीन मतदारांनी नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे.