कराड प्रतिनिधी | राज्यभरात अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना पुरोगामी सातारा जिल्ह्यातही धक्कादायक घटना समोर आली आहे. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव असलेल्या टेंभू गावात अनाथ आश्रमाच्या नावाखाली एका महिलेकडून देह व्यापार करून घेतला जात होता.
अनाथ आश्रमाच्या नावाखाली एका महिलेला जबरदस्तीने देह व्यापार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार टेंभू (ता. कराड) येथे उघडकीस आला आहे. टेंभू हे गाव समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मगाव असून या घटनेमुळे समाजसुधारकांच्या विचारांनाच हरताळ फासला गेला आहे. या प्रकरणात एका महिलेसह पुरूषाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षकांनी छापा मारून केली कारवाई
टेंभू (ता. कराड) येथील एक महिला अनाथ आश्रमाच्या नावावर महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याची माहिती कराडचे डीवायएसी अमोल ठाकूर यांना मिळाली. डीवायएसपी ठाकूर यांनी पोलीस पथकासह टेंभू गावात छापा टाकला. अनाथ आश्रमाची पाहणी केली असता त्यठिकाणी एक वृध्द महिला व तिची २१ वर्षाची गतीमंद मुलगी राहत असल्याचे आढळून आले. गतीमंद मुलीची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी तिला आशाकिरण वसतिगृहात पाठवले. अनाथ आश्रमात आणखी कोणी महिला, मुली येतात का, याची माहिती पोलीस घेत आहेत.
पीडित महिला पोहचली थेट पोलीस मुख्यालयात
पीडित महिला ही सातारा जिल्ह्यातील असून बुधवारी ती थेट पोलीस मुख्यालयात पोहचली. त्याठिकाणी तीने आपबीती माध्यमांना कथन गेली. ही माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलिसांचे पथक साताऱ्यात पोहोचले. पोलिसांनी तिला कराडला आणले. तिची चौकशी करून फिर्याद घेतली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक वर्षापूर्वी तिची टेंभू येथील अनाथ आश्रम चालक महिलेशी ओळख झाली होती. तिने पीडितेला आश्रमात नेवून पैशासाठी देह व्यापार करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद पीडितेने दिली.
संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी
पीडितेच्या फिर्यादीवरून कराड ग्रामीण पोलिसांनी अनाथ आश्रम चालक महिलेसह वाल्मीक महादेव माने (रा. म्हासोली, ता. कराड) या दोघांच्या विरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.