कराड प्रतिनिधी | महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे; परंतु निवडणूक आयोगाने सूचना केली म्हणून ही योजना बंद केल्याचे सत्ताधारी खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सातारा येथील काँग्रेस भवनामध्ये आ. चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आणि जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई उपस्थित होते. यावेळी आ. चव्हाण म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज बंद झाले आहेत. मुळात ही योजना धादांत खोटी आहे. आर्थिक टंचाईमुळे म्हणजे राज्याच्या तिजोरीत पैसे शिल्लक नसल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे; परंतु आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन, ही योजना बंद झाल्याचे राज्य सरकार सांगत आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना का फसवले, याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे.
महाविकास आघाडीची पहिली यादी लवकरच जाहीर होत असून, यामध्ये आम्हाला पुरेशा जागा मिळाल्या आहेत. जागावाटपाचे निर्णय सुरू आहेत. काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दोन दिवसांनंतर भरले जाणार आहेत. त्याकरिता पक्षाचे दोन निरीक्षक महाराष्ट्रात मुक्कामी असल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हंटले.