सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला आहे. यासाठी त्यांच्याकडून तब्बल 4 हजार 500 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. निवडणूक काळात अवैध प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी रूट मार्च, कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत. त्यांचे रेकॉर्ड तपासले जात असून, निवडणूक होण्यापूर्वी जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या व्यक्तींकडे शस्त्र परवाना आहे, त्यांना निवडणुकांअगोदर शस्त्र जमा करण्याचे आवाहन केलेले आहे.
काही ठिकाणी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असेल. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रत्येक पोलिंग बूथला पोलिसांचे संख्याबळ दिले जाणार आहे.राज्य राखीव बल, सीआरपीएफ, होमगार्डचे संख्याबळ आम्ही बंदोबस्तासाठी उपयोगात आणणार आहे. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचे वाटप, अंमली पदार्थांचे वाटप होत असेल तर त्यावर पोलिसांकडून लक्ष ठेऊन कारवाई केली जाणार आहे.