पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. एक ते दोन महिन्यात निवडणुकीच्या संहितेची घॊष्ण देखील होई. हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्ष कमला लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय रोमहर्षक पहायला मिळणार आहे. या जिल्ह्यातील महत्वाच्या विधानसभा मतदार संघांपैकी एक म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघ होय. या विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. येथील निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रनिहाय अंतिम प्रारूप मतदार यादी मागील प्रसिद्ध करण्यात आली असून पाटणचा आमदार सुमारे ३ लाख मतदार ठरविणार आहेत.
निवडणूक प्रशासनाकडून ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये नवीन नोंदणी, हरकती, दुरुस्ती केल्या असून, यामध्ये ८२१२ मतदारांची नावे समाविष्ट केली आहेत, तर २५१४ मतदारांची नावे कमी केली आहेत. पाटण मतदारसंघात एकूण ३ लाख ६ हजार ४०९ मतदार असून, यामध्ये पुरुष मतदार १ लाख ५५ हजार ३०८ व महिला मतदार १ लाख ५१ हजार ०९८ व तृतीयपंथी तीन आहेत. हे एक हजार पुरुषांमागे ९७३ स्त्रियांचे प्रमाण आहे. या एकूण मतदारांपैकी सुमारे ६० टक्के मतदार हे २० ते ४९ वयोगटातील आहेत.
आगामी आमदार निवडण्यात या मतदारांचा मोठा वाटा असणार आहे, तर ५० ते ६९ या वयोगटातील २८ टक्के मतदार आहेत. प्रसिद्ध अंतिम मतदार यादीनुसार ३० ते ३९ वयोगटांतील ६३९८१ इतके म्हणजेच २०.८८ टक्के मतदार आहे. त्यामुळे या वयोगटातील मतदारांशी इच्छुक उमेदवारांना संपर्क वाढवावा लागणार आहे. तसेच ८० हून अधिक वयोगटातील मतदारांची संख्या ९३४० आहेत. नवोदित मतदार असलेल्या १८ ते १९ या वयोगटामधील मतदारांची संख्या ८१०६ इतकी आहे.
पाटणला गुलाल उडणार कुणाचा?
पाटण विधानसभा निवडणुकीत महायुतीतील एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिह पाटणकर हे उमेदवार असणार आहेत. या निवडणुकीत पुन्हा पाटणकर- देसाई अशी लढत पहायला मिळणार असून यावेळी गुलाल कुणाचा उडणार? हे पहावे लागणार आहे.
पाटणला पुन्हा होणार चुरशीची निवडणूक
पाटण विधानसभा मतदार संघ हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा बालेकिल्ला आहे. सध्या या मतदार संघात त्यांचे नातू शंभूराज देसाई हे नेतृत्व करत आहेत. शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आणि सध्या शरद पवार यांच्या पक्षात असलेले विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह पाटणकर यांचेही या मतदार संघात वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत पुन्हा एकदा मंत्री शंभूराज देसाई यांचे आव्हान असेल.
2019 च्या निवडणुकीत देसाईंना 1 लाख 6 हजार 266 तर पाटणकरांना 92 हजार 91 मतं
याआधी २०१९ मध्ये पाटण विधानसभा मतदार संघात पाटणकर विरुद्ध देसाई अशी दुहेरी लढत झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये सामना झाला होता. त्यामध्ये शंभूराज देसाई विजयी झाले होते. निवडणुकीत शंभूराज देसाई यांना 1 लाख 6 हजार 266 तर सत्यजीतसिंह पाटणकर यांना 92 हजार 91 मतं मिळाली होती.