सातारा प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराने वाई येथील एका कंपनीची लुबाडलेली दीड कोटींची रक्कम संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून या गुन्हेगाराने लांबवली होती. ती परत मिळविण्यात सातारा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसीतील एका कंपनीने फ्रान्समधील एका कंपनीशी करार करून मशिनरी मागवली होती. यापोटी संबंधित कंपनीने 1 कोटी 53 लाख रूपये फ्रान्सच्या कंपनीच्या खात्यावर टाकले. मात्र, वाईतील कंपनीचे अकाऊंट हॅक करून ही रक्कम हॅकरने लंडनमधील एका बँकेत वळवली होती.
ही रक्कम मोठी असल्याने पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरविली. तसेच वाई पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे, सातारा यांना सूचना केल्या. त्यानुसार सायबर पोलिसांनी ही रक्कम पुन्हा मिळवण्यासाठी लंडनस्थित विदेशी बँकेला बीएनएसएस 94 प्रमाणे नोटीस पाठवून फसवणूक झालेली रक्कम होल्ड करण्यास सांगितले. त्यामुळे ही रक्कम कंपनीला परत मिळाली आहे.