शिरवळमध्ये 2 युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पळशी रोड याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत टोळीच्या दोन युवकांना पोलीसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून विनापरवाना बाळगलेल्या एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शिरवळचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धर्मसिंह पावरा, पोलिस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर आदीजण गस्त घालत होते.

दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांना पळशी रोडला असणाऱ्या एका अपार्टमेंटच्या वाहनतळ आवारात दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी पथकाने छापा टाकला असता त्याठिकाणी दुचाकी (एमएच ०२ डीडी ५९३०) या दुचाकीवर संशयास्पदरीत्या बसलेल्या दीपक संतोष पाटणे (वय २२, रा. विंग, ता. खंडाळा), ओम सतीश कदम (१८, रा. लोणी, ता. खंडाळा) आढळले. यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील कापडी पिशवीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली.

यावेळी पिस्तूल, काडसुतांसह दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विनापरवाना पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी दीपक पाटणे, ओम कदम याला अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक धर्मसिंह पावरा तपास करीत आहेत.