सातारा प्रतिनिधी | आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे सातारा जिल्हयातील खंडाळा येथे दि. 1 रोजी मोर्चा काढून पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आता 200 हून अधिक आंदोलकांवर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिसांनी दिलेले आदेश न मानता आणि जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून धनगर समाजातील आंदोलकांनी शुक्रवारी (दि. 1) दुपारी 12.55 ते सायंकाळी 5.40 पर्यंत, जवळपास पावणेपाच तास पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती.
या आंदोलनामुळे महामार्गावरील प्रवाशांना वेठीस धरल्याबद्दल रमेश नारायण धायगुडे (रा. अहिरे, ता. खंडाळा) आणि इतर दोनशे ते अडीचशे आंदोलकांवर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शरद यादव यांनी फिर्याद दिली असून, सहाय्यक फौजदार संजय पंडित तपास करत आहेत.
शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा
या रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांना वाहतुकीस अडथळा करू नका, असे आवाहन केले होते. त्यावर काही आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालून, धक्काबुक्की केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नरेश केसकर (रा. बावकलवाडी, ता. खंडाळा) आणि इतर 20 ते 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.