कराड प्रतिनिधी | पुणे, नागपूरनंतर सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आज शनिवारी (दि. १०) रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. कराड उपविभागातील १९० गुन्हेगारांची यावेळी पोलिसांनी चांगलीच झाडाझडती घेतली. पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप मिळाल्यापासून गुंडांचे धाबे दणाणले होते. बरोबर ठीक सकाळी दहा वाजण्याच्या ठोक्यावर गुंड पोलीस उपअधीक्षकांच्या ऑफिसमागील आवारात दाखल झाले. त्यानंतर साडे दहा वाजल्यापासून यादीनुसार गुंडांची परेड घेण्यास सुरुवात झाली. यावेळी आवारात ‘ए कैल्या, बाळ्या कुठाय?’, असे शब्द ऐकायला मिळत होते. दिवसभर पोलिसांनी सगळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून तसेच कडक समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले.
महायुतीच्या नेत्यांसोबत गुंडांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात सराईत गुन्हेगारांना बोलावून त्यांची हजेरी घेण्यात आली. पुण्यानंतर नागपुरातही गुंडांची परेड झाली. त्याच धर्तीवर आज शनिवारी साताऱ्यातील कराडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना कायद्याच्या भाषेत दम भरला. गुन्हेगारीला उत्तेजन देणारे रिल्स करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवला जाईल, असा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला. त्यामुळे अनेक गुंडांनी तिथल्या तिथं इनस्टाग्रामवरील रिल्स आणि अकाऊंट डिलीट केली.
कराड उपविभागात समावेश असलेल्या कराड शहर, कराड ग्रामीण, उंब्रज, मसूर आणि तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना शनिवारी सकाळी डीवायएसपी कार्यालयात हजर राहण्याचा निरोप देण्यात आला होता. निरोप मिळाल्यानंतर गुन्हेगारांना पुढचा अंदाज आला होता. त्यामुळे झाडून सगळे गुन्हेगार शनिवारी हजर होते. मोकळ्या आवारात बारदान अंथरूण त्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसाठी टेबल-खुर्ची मांडली होती. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार त्यांच्या समोर येऊन बसत होते.
कराड पोलीस उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर ते अतिगंभीर गुन्ह्यांची नोंद होते. पिस्तुलांची तस्करी, खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खासगी सावकारी, वर्चस्व वादातून टोळीयुद्ध, दहशत निर्माण करणे, अशा घटनांचा पूर्व इतिहास असल्याने सातारा जिल्ह्यात कराड पोलीस उपविभाग हा सर्वात अतिसंवेदनशील मानला जातो. त्यामुळे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कराड तालुक्यातील गुन्हेगारीवर कायमच लक्ष असते. त्यामुळेच जिल्ह्यात पहिल्यांदा कराडमध्ये गुंडांना हिसका दाखवण्यात आला.
कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी हजर राहिलेल्या सराईत गुन्हेगारांचे फोटो काढून डिजिटल क्राईम रेकॉर्ड (डोजीअर) तयार केले. तसेच सगळ्यांवर सीआरपीसी १०७, १०९ आणि ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
सहा महिन्यात 2 टोळ्यांना मोक्का : DYSP अमोल ठाकूर
मागील सहा महिन्यांत २ टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे तर १६ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अशीच कारवाई यापुढेही केली जाणार असल्याचा इशारा दिला असल्याची माहिती कराडचे पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.