पाटण प्रतिनिधी । कोयना विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाथरपुंज गावातील पोलीस पाटील प्रकाश चाळके यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच हेळवाक वन्यजीव विभागाचे वन्यजीव क्षेत्रपाल एस. एस. जोपाले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, गव्याने हल्ला केल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत घटनास्थळावरून व वन्यजीव विभागाकडून मिळालेली माहिती अशी, सातारा-सांगली-कोल्हापूर या तीन जिल्ह्याच्या सीमेवर कोयना विभागात अतिदुर्गम ठिकाणी पाथरपुंज हे गाव वसले आहे. याठिकाणी शासनाच्यावतीने सध्या पीक पहाणी नोंदी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत हे काम पाथरपूंज येथेही सुरू होते. रविवार दि. 6 रोजी सकाळीच पाथरपुंजचे पोलीस पाटील प्रकाश चंद्रकांत चाळके (वय ३९) हे दुपारी 12.30 च्या सुमारास जवळच असलेल्या गवीचा ओढा या शेतात पीक पाण्याची नोंद करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक शेताच्या झुडपात असलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्यात त्यांच्या डाव्या बाजूस बरकडीला गव्याचे शिंग लागले असून पायलाही गंभीर दुखापत झाली आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी आरडाओरड केल्याने व हल्ल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच स्थानिक लोकांनी त्या गव्याला हाकलून लावले. या घटनेची माहिती मिळताच हेळवाक वन्यजीव विभागाचे वन्यजीव क्षेत्रपाल संदीप जोपाले, वनरक्षक एस. एस. दापते, वनमजुर सपकाळ, गणेश पवार, चालक सचिन विचारे यांना सोबत घेऊन घटनास्थळी तातडीने पोहोचले व जखमी प्रकाश चाळके यांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा वनविभागाने केला आहे. सतत गव्याच्या हल्ल्याने येथील लोकांचे जीवनमानच धोक्यात आले आहे. या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने लोकांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. हल्ल्यात जखमी झालेल्याना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.