कराड प्रतिनिधी । चारचाकी वाहने चालवताना किरकोळ वादावादीचे प्रकार अनेकवेळा घडतात. मात्र, शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे मारामारीत होते. अशाच प्रकार कराडनजीक मलकापूरातील ढेबेवाडी फाटा येथे बुधवारी घडला. पोलीस व्हॅन रस्ता क्रॉस करत असताना पोलीस कॉन्स्टेबलने एका कार चालकास कार थोडी मागे घे असे म्हंटले. या कारणावरून चिडून जाऊन कार चालकासह पत्नी व इतर दोघांनी पोलीस कॉन्स्टेबलला व्हॅनमधून खाली ओढत मारहाण केली. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला तस त्याला अटक करून आज न्यायालयात देखील हजर करण्यात आले आहे.
शुभम अरुण भोसले ( रा. कोल्हापूर) असे मारहाण करणाऱ्या कार चालकाचे नाव आहे. तर ब्रम्हादेव माने असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरानजीक असलेल्या मलकापुरातील ढेबेवाडी फाटा येथून पुणे कोल्हापूर महामार्गावरून कार चालक शुभम भोसले हा येत होता. यावेळी त्याच्या कारच्या शेजारून रस्ता क्रॉस करत असताना पोलीस व्हॅनला जागा अपुरी पडल्याने पोलीस व्हॅन मधील पोलीस कॉन्स्टेबलने कार चालक शुभम भोसले याला कार पाठीमागे घे असे सांगितले.
या कारणावरून पोलीस कॉन्स्टेबलला कार चालक शुभम भोसले याच्यासह पत्नी व दोन अन्य व्यक्तींनी आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन ” रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का?, मी गाडी मागे घेत नसतो, तु पुढे कसा जातोस बघतोच” असे म्हणुन पोलीस कॉन्स्टेबलच्या व्हॅनमधून खाली ओढले. तसेच कॉन्स्टेबलचा हात धरुन गाडीतून खाली ओढुन हात पिरगळुन खाली पाडले व मारहाण केली असल्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मदेव माने यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबलच्या फिर्यादीनंतर संबंधित कार चालक शुभम भोसले यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.