सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील तृतीयपंथीयाचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गुन्याचा छडा लावला.
माण तालुक्यातील तृतीयपंथीयाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस आला आहे. म्हसवड पोलिसांनी मृताच्या हातावरील गोंदलेल्या नावावरून संशयिताला बेड्या ठोकल्या. राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, असं खून झालेल्या तृतीयपंथीचं तर समाधान विलास चव्हाण (रा. दिवड, ता. माण), असं संशयिताच नाव आहे.
लग्नाच्या तगाद्यामुळे काढला काटा
मृत राशी आणि संशयित समाधान याचे बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुझ्या घरी येऊन रहायचे आहे, असा तगादा राशीने समाधानकडे लावला होता. मात्र, समाधान हा विवाहित असल्याने तो नकार देत होता. सततच्या तगाद्याला समाधान कंटाळला होता. पाच दिवसापूर्वी त्याने राशीला म्हसवडमधील मेघासिटीजवळ सायंकाळी आठच्या सुमारास बोलावून घेतलं आणि साडीने गळा आवळून खून केला.
मृतदेह वायरने दगडाला बांधून विहिरीत टाकला
राशी मृत झाल्याची खात्री पटताच पुरावा नष्ट करण्यासाठी विद्युत वायरला भला मोठा दगड मृतदेहाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला. कुजल्यामुळे मृतदेह फुगून विहिरीच्या पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतदेह कुजल्यामुळे मृताची ओळख पटवण्याचे आव्हान होते. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून मृताची ओळख पटली. हातावर गोंदलेल्या नावावरून दिवड (ता. माण) येथील समाधान चव्हाण याचे नाव निष्पन्न झाले.
संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी संशयित समाधान यास दिवड येथील शेतातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असताना केवळ हातावर गोंदलेल्या नावावरून तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार आणि त्यांच्या पथकाने अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणला.