कराड उत्तरमध्ये एकाच व्यक्तीची तब्बल 462 बोगस ऑनलाईन अर्जांद्वारे मतदार नोंदणी, संशयित पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुमारे ३० अर्ज केल्याची घटना साताऱ्यातील वडूजमधून समोर आली होती. आता मतदार नोंदणीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला असून संशयित अविनाश विजय धर्मे (रा. गायकवाडनगर, पूनावळे), याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून वीज देयकात खाडाखोड करीत एकाच नावाने तब्बल ४६२ अर्ज दाखल झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितास पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत ५ ते १३ सप्टेंबर या कालावधीत संशयित धर्मे याने एकाच नावाने हजारमाची येथील व्यक्तीच्या वीज देयकात खाडाखोड करून स्थलांतरितांसाठीच्या नमुना नंबर आठचे तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले होते.

निवडणूक आयोगाच्या पोर्टल आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणीअंतर्गत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी व स्थलांतरित अर्ज सुविधेचा गैरवापर करीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात नमुना आठ या अर्जाद्वारे अविनाश धर्मे या व्यक्तीने स्थलांतर दाखवून पोर्टलमध्ये ४६२ अर्ज दाखल केले आहेत. अर्जासोबत रहिवासाबाबतचा पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी (रा. हजारमाची, ता. कराड) यांचे वीज देयक व त्यावरील ग्राहक क्रमांकात अखेरच्या चार अंकामध्ये व्हाइटनरचा वापर करून खाडाखोड केली आहे.

पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली खाडाखोड केलेले हे वीज देयक ऑनलाईन अपलोड केले आहेत. निवडणूक शाखेने कागदपत्रांची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम ३१ या कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा नोंद केला. त्यावर पोलिसांनी तपास करत या संशयित धर्मे यास ताब्यात घेतले आहे. सध्या कराड शहर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.