सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. साताऱ्यातील माजी नगराध्यक्षांच्या मुलाने खुनाच्या सुपारीचा पर्दाफाश झाला असून सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे खूनाची घटना टळली आहे. 5 जणांच्या सशस्त्र टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहरच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केल्यानंतर माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच खुनाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा उडवाउडवी केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच टोळीने सुपारी घेतल्याची कबूली दिली. संशयितांकडे देशी बनावटीची दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, चार रिकाम्या पुंगळ्या, दोन लोखंडी सुरे व महागडे मोबाइल, दोन दुचाकी सापडल्या आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांचे पती वसंत लेवे यांना मारहाण झाली होती. हा राग मनात धरून धीरज ढाणे (वय 45, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा काटा काढण्यासाठी वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश लेवेनं संशयितांना 20 लाखांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या घटनेमुळे साताऱ्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. लेवे यांच्या मुलाने धीरज ढाणेला मारण्यासाठी अनुज पाटील याला 20 लाखांची खुनाची सुपारी दिली. त्यातील दोन लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते.
पोलिसांनी अनुज चिंतामणी पाटील ( वय 21, रा. गुरुवार पेठ), दीप भास्कर मालुसरे (वय 19, रा. गुरुवार पेठ, शिर्केशाळेजवळ, सातारा), आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी (वय 25, रा. हनुमाननगर, इचलकरंजी, कोल्हापूर), अक्षय अशोक कुंडूगळे (वय 25, रा. जवाहरनगर इचलकरंजी, कोल्हापूर), क्षितिज विजय खंडाईत (रा. गुरुवार पेठ) या पाचजणांना अटक केली. सुरुवातीला संशयित आरोपींनी सराफ पेढीवर दरोडा टाकणार होतो, अशी खोटी माहिती पोलिसांना दिली. परंतु पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच धक्कादायक माहिती समोर आली.