सोने लुटणाऱ्या टोळीतील एकाला पोलिसांनी घेतले कराडातून ताब्यात

0
4

कराड प्रतिनिधी | ज्येष्ठ महिलांना गाठून हातचलाखी करत बनावट सोन्याची वीट देऊन सोने लुटणारी बिहारमधील टोळीचा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. त्यातील एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शुक्रवारी ताब्यात घेतले.

वीरेंद्र साहू (वय ३२, मूळ रा. बिहार, सध्या कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर त्याचे अन्य 5 साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. भामटेगिरीतून कराड येथील एका ज्येष्ठ महिलेची लुटलेली दीड तोळ्याची सोन्याची साखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता अशोक तरटे (वय ५८, रा. बेलवडे, ता. पाटण) यांना दोन दिवसांपूर्वी कराड एस टी स्टँड परिसरात भामट्यांनी बनावट सोन्याची वीट देऊन त्यांच्या दीड तोळ्याच्या सोन्याची लूट केली होती. त्यांनी पोलिसात त्याची फिर्याद दिली होती. त्या पद्धतीने अन्य एका ज्येष्ठ महिलेस त्यांनी लुटले होते. त्या महिलांच्या पायात बनावट सोन्याची वीट टाकून त्यांना भुलवून हातचलाखी करत त्यांच्या अंगावरील खरे सोने लुटले जात होते. त्याचा तपास करताना शिराळा व पलूसमध्ये एकसारख्या चोऱ्या झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

सहायक पोलिस निरीक्षक भापकर यांनी तांत्रिक आधाराने त्याचा तपास करताना त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांनी काही लोकांवर वॉच ठेवला. त्यांना त्यांच्या बातमीदारा कडूनही माहिती मिळाली. त्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर त्यांच्यावरून तपास झाला. त्यावेळी सहा जणांची टोळी असल्याचे जवळपास निश्चित होते. त्यातील वीरेंद्र साहू कराडमध्ये राहात होता. त्याचा भागात जास्त वावर होता. चोरीच्या घटनेदिवशी त्याचे लोकेशन कराड दाखवत होते.

त्याचा पत्ता शोधून काढला. त्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर व पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांना त्यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक भापकर फौजदार आंदलकर, डीबीचे धीरज कोरडे, मोहसीन मोमीन, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ, अमोल देशमुख असा पथकाने वीरेंद्रच्या घरावर छापा टाकला.

पोलिस येण्यापूर्वीच अर्धा तास आदी तेथून त्याचे पाच साथीदार निघून गेल्याने वाचले. मात्र, वीरेंद्र पोलिसांच्या – तावडीत सापडला. तेथून तो पळून निघाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे कसून तपास केला असता अनेक संशयित वस्तू सापडल्या. त्याच्याकडून महिलेचे लुटलेले एक तोळ्याचे दागिनेही जप्त झाले आहे. त्याच्याकडे अशा लुटीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोल्ड पॉलिश, चांदी पॉलिश पावडर आणि सोन्यासारखी दिसणारी वीट मिळून आली आहे.