सातारा प्रतिनिधी | प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्या च्या साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून निरा उजवा कालवामध्ये टाकल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. याप्रकरणी फलटण पोलिसांनी शिताफीने तपास करुन मृताच्या पत्नीस अन् तिच्या प्रियकराला अटक केली. अद्याप एकजण फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास अजित पोपट बुरूंगले (वय २४, रा. नगरपरीषद शाळा क्रमांक ०७ पाठीमागे, शिवाजीनगर, फलटण) हा घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान मंगळवारी (दि१९) विडणी गावच्या हद्दीत निरा उजवा कालव्यामध्ये एक मृतदेह सापडला. तपासाअंती हा मृतदेह अजितचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करीत असताना अजित याच्या पत्नीकडे चौकशी केली असता तिचे लग्नापूर्वी करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. प्रेमसंबधास पतीचा अडथळा येत असल्याने करण भोसले याने त्याचा साथीदार राहुल उत्तम इंगोले याच्या मदतीने खुनाचा कट रचला.
रविवारी (दि.१७) रात्री त्याने अजित बुरुंगले याला फोन करून घराबाहेर बोलावून घेतले. यावेळी दोघांनी अजितचा दोरीने गळा आवळून खून केला. अन् हात पाय बांधून पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने मृतदेह निरा उजवा कालव्यामध्ये टाकला. याबाबतची कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले याने दिली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या खून प्रकरणी अजितची पत्नी आणि करण भोसले यास अटक केली आहे. राहुल इंगोले हा फरारी असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली सुनील शेळके करीत आहेत.