सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गेल्या 15 जूनपासून सुरू झालेल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्यांच्या खरिपाच्या आशा मावळल्या आहेत. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकर्यांकडून होऊ लागली आहे.
जावळीत सरासरी 1300 मिलिमीटर वार्षिक पर्जन्यमान होत असते. मात्र, जून महिन्यातच पावसाने निम्म्याहून अधिक पावसाची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या खरीप पेरणीवर पाणी फेरले आहे. जूनअखेर 363 टक्के अधिकचा पाऊस झाल्याने आता उरलेल्या तीन महिन्यात आणखी किती पाऊस झोडपणार? याची धास्ती वाटू लागली आहे. जावळीत सुमारे1700 हेक्टर क्षेत्र हे खरिपाचे असून, त्यापैकी 800 हेक्टर भात पिकाखाली, तर उरलेले सोयाबीन, भुईमूग, घेवडा व इतर कडधान्याचे आहे.
यंदा मे महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र, त्यालाच जोडून मॉन्सून सक्रिय झाल्याने शेतकर्यांना मशागतीची कोणतीच कामे करता आली नाहीत. उन्हाळ्यातील शेणखत टाकणे, बांधबंदिस्ती करणे यासारखी कामे सततच्या पावसाने यंदा करताच आली नाहीत. काही शेतकर्यांकडून पावसाने दोन तीन दिवस उघडीप दिल्यावर पेरण्या करण्यात आल्या. मात्र, त्याचे प्रमाण अल्प आहे. तालुक्यातील बहुतांश खरिपाचे क्षेत्र अद्यापही पावसानेउघडीप देण्याच्या प्रतीक्षेत आहे. सरासरीपेक्षा अधिकच्या झालेल्या पावसाने विहिरी, तलाव, ओढे भरून वाहत आहेत. तरीही शेतातून पाण्याचे उपळे फुटले आहेत. अनेकांनी पेरणीसाठी महागडी खते, बी बियाणे खरेदी करून ठेवले आहेत. मात्र, त्याचा आता उपयोग होईल, असे वाटत नाही. आजवर अनेकदा पावसामुळे पेरण्या रखडल्या होत्या. त्या बेंदूर सणापर्यंत चालायच्या. यंदा मात्र बेंदूर आठ दिवसांवर येऊन ठेपला, तरी रानातले पाणी न हटल्याने खरीप वाया जाण्याची शक्यता आहे. कुडाळ, हुमगाव व आनेवाडी परिसरात
आडसाली उसाच्या लागणीही मोठ्या प्रमाणात होत असतात. यंदा आडसाली लागणीसाठीची रानेच तयार करता आली नाहीत, तर बहुतांश शेतकर्यांच्या पूर्वहंगामी, सुरू व खोडवा उसाच्या भरीदेखील करता न आल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.