कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दर आठवड्याला तरूणांकडे बेकायदेशीर शस्त्रे सापडत आहेत. बेकायदेशीर शस्त्रे घेवून तरूण खुलेआम फिरत आहेत. सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा अशा बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई करत असून कराड तालुक्यातील कोरेगावच्या यात्रेत पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. निखिल शशिकांत थोरात (वय २५, रा. नांदलापूर, ता. कराड), असे संशयिताचे नाव आहे.
ग्रामदैवताच्या जत्रेत पिस्टल घेवून एक तरूण फिरत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेशित केले होते. २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास एलसीबीचे पथक कार्वे, कोरेगांव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक तरूण रस्त्याने चालत येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७० हजार रूपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि १ जिवंत काडतूस सापडले. याप्रकरणी संशयित निखिल शशिकांत थोरात या संशयिताविरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून आजअखेर ८७ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर बंदक, १ रायफल, १९७ जिवंत काडतुसे, ३८५ रिकाम्या पुंगळ्या आणि १ रिकामे मॅग्झीन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सहाय्यक फौजदार सुधीर बनकर, हवालदार विजय कांबळे, संजय शिर्के, अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धीरज महाडीक, मोहसीन मोमीन, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम यांच्यासह कराड ग्रामीणचे सपोनि अभिजीत चौधरी, अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळी यांनी ही कारवाई केली आहे.