सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील गजबजलेल्या शास्त्री चौकात मालट्रकने चिरडल्याने वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. संपत लक्ष्मण ठोंबरे (वय ५३) असे अपघातात म्रुत्यु झालेल्या वृद्ध पादचाऱ्याचे नाव आहे. चालक राधेश्याम प्रतापसिंह जमरा (वय २७, रा. कामठा, जिल्हा धार, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील शास्त्री चौकात आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नीरा बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने मालट्रक क्रमांक (MH 18 BG 4986) निघाला होता. यावेळी मालट्रकने पायी चालत जात असलेल्या संपत लक्ष्मण ठोंबरे (रा. कोपर्डे, ता. खंडाळा) यांना जोराची धडक दिली. या धडकेत संपत ठोंबरे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
अपघातानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद लोणंद पोलिसात करण्यात आली असून चालक राधेश्याम प्रतापसिंह जमरा (वय २७, रा. कामठा, जिल्हा धार, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघाताच्या घटनेचा तपास लोणंद पोलिस करीत आहेत.