पाटण प्रतिनिधी । पाटण येथील प्रांत कार्यालयात नवीन वर्षाची महसुली भेट.. थेट वारस नोंद या मोहिमे अंतर्गत पाटणच्या महसूल विभागामार्फत प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्या हस्ते वारसांना सातबारा, फेरफार, वारस रजिस्टर, वारस नोंद झालेले सात बारा-खाते उतारे वाटप करून मोहिमेचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी करण्यात आला. वारस नोंद तात्काळ व्हावी हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवीन वर्षाची महसुली भेट.. थेट वारस नोंद मोहीम पाटण महसूल प्रशासन राबवित आहे. त्याला लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. सातारा जिल्ह्यात एकमेव पाटण तालुक्यात हा अभिनव उपक्रम पाटण महसूल प्रशासनाने सुरू केला असून या उपक्रमाचे राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास मंडल अधिकारी विलास गभाले, ग्राम महसूल अधिकारी श्रीराम पन्हाळकर, पंढरीनाथ शिंदे, एस. जी. बोबडे, अक्षय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार अनंत गुरव म्हणाले, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली थेट वारस नोंद ही मोहिम राबविली जात आहे. रखडलेल्या वारसाच्या नोंदी महिनाभरात तयार करून १४ मंडलात त्याचे वाटप केले जात आहे. प्रत्येक मंडलात २०० लाभ वितरीत करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार आज रोजी १८ वारसाच्या नोंदी, वारसाचे ठराव, २० खाते उतारे व २०८ सातबारे, अशा प्रकारे २६० लाभांचे वितरण मंडलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले आहे.
यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे म्हणाले की, पाटण मंडलात आज २६० लाभाचे वाटप करण्यात आले. या मोहिमेमुळे रखडलेल्या वारसाच्या नोंदी लागण्यास मदत होत असून त्याचा लाभ लाभार्थ्यांना विविध योजनांसाठी देखील होणार आहे. ज्यांच्या वारस नोंदी लावणे शिल्लक आहे त्यांनी तात्काळ अर्ज करावेत. तालुक्यात एकूण १४ मंडलात हा उपक्रम राबविला जाणार आहे. एखादी व्यक्तीवमयत झाल्यानंतर कित्येक वर्ष त्याची वारस नोंद लागत नाही. अतिवृष्टी, दुष्काळ अशावेळी शासनाकडून एखादी मदत जाहीर केली जाते. मदत घेण्यसाठी शेतकरी जातात त्यावेळी त्यांना बँक मदत करत नाही. कारण सदर व्यक्ती ही मयत झालेली असते.
अशावेळी वारसांची संमती घ्या, प्रतिज्ञापत्र घ्या, अशी प्रत्येक टप्प्यावर पध्दत अवलंबावी लागते ती वारस नोंद न झाल्यामुळेच. त्यामुळे वारस नोंद तात्काळ व्हावी हा प्रमुख उद्देश आमचा आहे. यापुढे जावून आम्ही तालुक्यात जेवढ्या व्यक्ती मयत आहेत त्यांची माहिती घेत आहोत. त्याचा फायदा मयताच्या वारसाच्या नोंदी करण्यासाठी होईल. तसेच धान्य मिळविणे, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना यांसह शासनाच्या आर्थिक योजना आहेत यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.