पाटण प्रतिनिधी | शेतीत घेण्यात येणाऱ्या विविध पिकांची नोंद घेता यावी, तसेच कोणत्या भागात कोणत्या पिकांचे उत्पादन घेतले जाते, याची नोंद ई-पीक अॅपद्वारे करणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनीच मोबाईल अॅपद्वारे ही नोंद करण्याची सुविधा राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे ‘ई-पीक’ पाहणी प्रकल्पांतर्गत राज्यात आतापर्यंत पीक नोंदणीच्या अहवालातून काही बाबी समोर आल्या आहेत. त्यात ‘ई-पीक’ नोंदणीमध्ये जिल्ह्यात पाटण तालुका पिछाडीवर आहे.
राज्यात गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून ई-पीक मोबाईल अॅप सुरू करण्यात आले होते. त्यामुळे ई-पीकद्वारे शेतीच्या नोंदी वाढत आहेत. खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा पेरा नोंदणी करावी, यासाठी एक ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत ई-पीक पाहणी मोहीम राबविण्यात आली. यात शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्यात आला. यानुसार पाटण तालुक्यात ११ हजार २३५ शेतकऱ्यांनी चार हजार २९३ हेक्टर क्षेत्रानुसार ई-पीक पेरा नोंदविला आहे.
पेरणीनंतर दरवर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या स्तरावरून पीक पेरा नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी शासनाने यंदा एक ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पेरा नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले होते.
यादरम्यान पेरा नोंदणी कमी झाल्यामुळे यास २३ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. या कालावधीत पाटण तालुक्यात चार हजार २९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या पेऱ्याची नोंद झाली आहे. यात २१ गावांतून एकही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.