कराड प्रतिनिधी । मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व तळमावळे येथील महसूल मंडलातील बीएलओमार्फत मयत मतदारांची यादी बनवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाचा आज पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी प्रत्यक्ष भेट देत आढावा घेतला. प्रांताधिकाऱ्यांनी ढेबेवाडी विभागात प्रत्यक्ष पाहणी करून मृत्यूच्या नोंदी नसलेल्या ठिकाणी संबंधित मयत मतदारांच्या नातेवाईकांचे जबाब घेऊन त्यानुसार फॉर्म नं. ७ भरण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी गाडे म्हणाले की, बी.एल.ओ. यांच्यामार्फत जास्तीत जास्त मयत मतदारांबाबत फॉर्म नं. ७ भरून घेतले जात आहेत. तसेच विवाह होऊन पूर्वीच दुसऱ्या गावी, राहण्यास गेलेल्या अनेक मुलींची नावे पाटण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावांतील मतदारयादीत आहेत. अशा मुलींच्या वडील, भाऊ व नातेवाईक यांचा जबाब व पंचनामा घेऊन त्यांची नावे त्या गावातील मतदारयादीतून कमी करण्यात येत आहेत. त्याचबरोबर गावात नव्याने विवाह होऊन आलेल्या मुलींचेदेखील नाव नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.
यावेळी प्रांताधिकारी गाडे यांनी पाटण शहरातील बीएलओ यांची बैठक घेऊन उर्वरित मयत मतदारांबाबत फॉर्म नं. ७ भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तहसील कार्यालयात हे फॉर्म पाठवण्याचे काम सुरू आहे. युद्धपातळीवर मयत मतदारांची नावे कमी करणे व नवीन मतदारांची नोंदणी वाढविण्याचे काम करण्यात येत आहे.